मागील वर्षभरात फक्त 57 लाखांचे उत्पन्न
प्रतिसाद कमी मिळाल्याने सुविधा तोट्यात
पुणे – महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी पीएमपीची “पुणे दर्शन’ बससेवा सुरू आहे. मात्र, जानेवारी ते डिसेंबर 2019 या एक वर्षात केवळ 11 हजार 406 लोकांनी पुणे दर्शन बससेवेचा लाभ घेतला आहे. यातून पीएमपीएलला केवळ 57 लाख वार्षिक उत्पन्न मिळाले आहे. या आकडेवारीवरुन पुणे दर्शनला प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळाल्याचे दिसून आले असून परिणामी ही सेवा तोट्यात सुुरू आहे.
पीएमपीने पर्यटकांसाठी पुणे दर्शन ही बससेवा सुरू केली. याअंतर्गत शहर व परिसरातील जवळपास 20 ठिकाणांचे दर्शन घडवले जाते. त्यासाठी पर्यटकांना 500 रुपये तिकीट असून दोन वातानुकूलीत बस उपलब्ध आहेत. पर्यटकांना याचा लाभ घेण्यासाठी पुणे स्टेशन व डेक्कन जिमखाना या बसस्थानकासह ऑनलाइन बुकिंग उपलब्ध करुन दिले आहे. मात्र, या सेवेला प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. पुणे दर्शनच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांत दोन वातानुकूलित बसेसचा इंधनखर्चही भागत नसल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे दर्शनची ठिकाणे
शनिवारवाडा, सारसबाग, राजा दिनकर केळकर संग्रहालय, क्रिकेट संग्रहालय, लाल महल, शिंदे छत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, आगा खान पॅलेस, दगडूशेठ गणपती मंदिर, केसरीवाडा, महात्मा फुले वाडा, चतु:शृंगी माता मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, आदिवासी वस्तू संग्रहालय.