पुणे : सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल ते निलायम पूला पर्यंतच्या सुमारे दोनशें मीटर अंतरात रस्ता दुभाजक म्हणून उभारण्यात आलेले लोखंडी बॅरीकेडस तीन ते चार ठिकाणी गायब झाल्याने या रस्त्यावर अपघातांंचा धोका वाढला आहे. या बॅरीकेडस तुटलेल्या ठिकाणांचा वापर पादचारी तसेच रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहने करत असल्याने प्राणांतिक अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, महापालिकेने तातडीनं हे दुभाजक पूर्ववत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
स्वारगेटकडून सिंहगड रस्ता तसेच पुढे कोथरूड कडे जाणाऱ्या वाहनांसाठीचा हा शहरातील मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दांडेकरपूल वसाहत असून या भागात नागरिकांची रस्त्यावर मोठी वर्दळ असते. तसेच २४ तास या रस्त्यावर जड वाहनांसह इतर वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर दांडेकर पूल ते निलायम पर्यंत कुठेही चारचाकी वाहनांसाठी पंक्चर नव्हते. तर पादचारी नागरिक राष्ट्र सेवा दलाच्या इमारतीपासून पुढे पादचारी मार्गारे रस्ता ओलांडत असत.
मात्र, मागील काही महिन्यात या ठिकाणी असलेले दुभाजकाचे लोखंडी बॅरीकेड गायब झाले असून दोन ते तीन ठिकाणी रस्ता पंक्चर झाला आहे. परिणामी चारचाकी वाहने वळसा टाळण्यासाठी याचा गैरफायदा घेत आहेत तर नागरिकही वळसा टाळण्यासाठी या ठिकाणाहून रस्ता ओलांडत आहेत. त्यामुळे दांडेकरपूलाकडून स्वारगेट कडे जाणाऱ्या वाहनांच्या समोर अचानक ही रस्ता ओलांडणारी वाहने तसेच पादचारी येत असून प्राणांतिक अपघात होण्याची शक्यता आहे.
“या भागातील रस्ता दुभाजक अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर विरोध्द दिशेने येणारी वाहने वाढली असून अपघातांचा धोका वाढला आहे.” – दिपक वाघमारे ( स्थानिक नागरिक)