लॉकडाऊनमुळे ओढावलेल्या दैन्यवस्थेतून आलेली अपरिहार्यता
खासगी पार्ट्यांतून ताब्यात घेतलेल्या आर्टिस्टची “आपबिती’
संजय कडू
पुणे – करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीतून सावरण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. असाच फटका स्टेज आर्टिस्टना बसला आहे. करोनामुळे पार्टी, बर्थडे, लग्न समारंभ, मनोरंजन कार्यक्रम मागील 15 महिन्यांत पूर्णपणे बंद आहेत. यामुळे हे कलावंत चोरीछुपे होणाऱ्या पार्ट्यांमध्ये परफॉर्म करत आहेत.
पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईतून ही बाब समोर आली आहे. मागील महिनाभरात सुमारे 22 स्टेज आर्टिस्ट महिलांना फार्म हाऊसमधील पार्ट्यांमधून ताब्यात घेण्यात आले आहे. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई करत त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. यात ग्रामीण पोलिसांनी 17, तर शहर पोलिसांनी 5 महिलांवर कारवाई केली आहे.
लॉकडाऊन-2 मध्ये मागील दोन महिन्यांत कडक निर्बंध होते. यामुळे हातावर पोट तसेच कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या महिलांना काही दलाल पैशांचे आमिष दाखवत जाळ्यात अडकवत आहेत, तर काही महिला स्वत: अशा दलालांशी संपर्क साधत आहेत.
बॉलीवूड पार्ट्या, मनोरंजनाचे मोठे कार्यक्रम, तसेख विविध स्टेज शोमध्ये भाग घेणाऱ्या महिला कलावंतांची संख्या हजारोंच्या घरात आहे. नृत्य प्रशिक्षण घेतलेल्या तरुणींना स्टेज आर्टिस्ट म्हणून झटपट पैसे कमावण्याची संधी मिळते. यामुळे परराज्यांतील अनेक तरुणी मुंबई-पुण्यात येऊन स्टेज आर्टिस्ट म्हणून काम करतात.
काही जणींना चित्रपटांत गाण्यांमध्येही परफॉर्म करण्याची संधी मिळते. मात्र, करोनामुळे बॉलीवूड ठप्प आहे. यामुळे संबंधित कार्यक्रम आणि पार्ट्याही बंद आहेत. याचा जबर फटका या स्टेज आर्टिस्टना बसला आहे. यातील काही जणी मूळ गावी परतल्या आहेत, तर काहींना पर्याय नसल्याने ते एजंटांद्वारे मिळेल ती कामे करण्यास तयार होत आहेत. यामुळे खासगी पार्ट्यांमध्ये त्या परफॉर्म करत आहेत. पोलीस कारवाईची भीती असतानाही त्या धोका पत्करत आहेत.
माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी बंगला व फार्म हाऊसवर छापे टाकले. तेव्हा तिथे नृत्य करणाऱ्या महिला आढळल्या. त्यांचे जबाब नोंदवले असता, खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्या येथे आल्याचे समोर आले. या महिला खासगी पार्टी किंवा मोठ्या समारंभांत स्टेज परफॉर्म करतात. मात्र, सध्या काहीच काम नसल्याने त्या दलालांच्या माध्यमातून फार्म हाऊसवर आल्याचे समजले. त्यांची निरीक्षणगृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.
– अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
दलालांची साखळी
स्टेज परफॉर्म करणाऱ्या महिलांचे ग्रुप आहेत. एजंट काही दिवसांसाठी त्यांचा ठेका घेतात. यानंतर गरजेनुसार त्यांना पाठवले जाते. त्यांच्या प्रवास, जेवण आणि वास्तव्याची सोय दलालांमार्फत केली जाते. सध्या त्यांना फक्त छुप्या पार्ट्यांमध्येच संधी आहे. यामुळे मुंबईतील अनेक महिला लोणावळा, खंडाळा व ग्रामीण भागात आलेल्या दिसत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग) पद्माकर घनवट यांनी दिली.
“माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी’
पुण्यातील चांदणी चौक परिसरात राहणाऱ्या आशाने (नाव बदलले आहे) सांगितले, की करोनामुळे सर्वच कार्यक्रम बंद आहेत. माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने मी फूड डिलिव्हरीचेही काम केले. मात्र, हळूहळू खासगी पार्ट्यांची आमंत्रणे येऊ लागली. यात पैसाही चांगला मिळत असल्याने मी आधीची नोकरी सोडली. आता मी खासगी पार्ट्यांमध्ये परफॉर्म करते. मला जाण्या-येण्यासाठी कॅबची व्यवस्थाही केली जाते.