पुणे – यंदा खडकवासला प्रकल्पातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चार धरणे 100 टक्के भरली आहेत. खडकवासला प्रकल्पात एकूण 28.79 टीएमसी पाणी जमा झाले आहे. मात्र, चांगल्या पावसामुळे धरणे भरल्याने खडकवासला धरणातून या हंगामात आतापर्यंत 27.6 टीएमसी एवढे पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी पुढे उजनी धरणास जाऊन मिळते.
यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस पडला. त्यामुळे वर्षभर शेतीसाठीच्या व शहराची पाण्याची चिंता मिटली आहे. मागील वर्षे जेमतेम पाऊस पडल्यामुळे धरणे 90 टक्के भरली होती. मागील वर्षी खडकवासला धरणातून सुमारे दोन टीएमसीपर्यंत विसर्ग करण्यात आला होता. यंदा मात्र चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने धरणे तर भरलीच; परंतु विसर्गसुद्धा चांगला झाला आहे.
खडकवासला धरणाच्या वरील बाजूस पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही तीन धरणे आहेत. त्यामुळे पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होते. त्यामुळे खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडण्यात येते.
खडकवासला धरणात दि.1 जूनपासून आतापर्यंत 895 मिमी, पानशेत धरणात 2 हजार 481 मिमी, वरसगाव धरणात 2 हजार 509 मिमी आणि टेमघर धरणात 3 हजार 838 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.