पुणे – दररोज उघडपणे लाखो लिटर पाण्याची ‘चोरी’

पालिका नळयोजनेतून बेकायदेशीर कनेक्‍शन घेऊन “मिनरल वॉटर’चा व्यवसाय


40 पेक्षा जास्त “आरो प्लांट’

पुणे – उन्हाचा तडाखा वाढत चालला असून, त्यासोबतच धरणातील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. त्यातून शहरावर पाणीकपातीचे संकट आले असतानाच दुसरीकडे मात्र दररोज उघडपणे लाखो लिटर पाण्याची “चोरी’ होत असल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागांसह उपनगरांमध्ये जोमात सुरू असलेल्या 40 पेक्षा जास्त कथित “आरओ प्लांट’मधून बिनबोभाट पालिकेने पाणी उचलले जात आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सोईस्कररित्या दुर्लक्ष होत असून, अद्याप एकावरही कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले आहे.

पाण्याच्या “ब्रॅन्ड’च्या नावाखाली हे पाणी मोठमोठ्या कंपन्यांना वितरित केले जाते. हे पाणी शुद्ध आहे किंवा नाही याची तपासणी तर केली जातच नाही, परंतु हे पाणी विकत घेणाऱ्यांकडूनही पाण्याच्या शुद्धतेबाबत खातरजमा केली जात नसल्याचेही यातून दिसून आले आहे. महापालिकेच्या जलवाहिन्यांमधून अनधिकृरित्या नळजोड घेऊन हे पाणी उचलले जात आहे.

एवढेच नव्हे तर बेकायदेशीरपणे या पाण्याचे बॉटलिंग करण्याचे प्रकार राजरोस सुरू असताना यावर कारवाई होत नसल्याची तक्रार महापालिकेतील एका पदाधिकाऱ्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. मात्र, पाणीकपातीचे संकट लक्षात घेता महापालिकेने आता अनधिकृत नळजोड आणि बेकायदा मोटर बसवून पाणी खेचून घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. परंतु, या “आरो प्लांट’ चालवणाऱ्यांवर मात्र काहीच कारवाई केली जात नाही. मागील वर्षी या ठिकाणांवर “स्टींग ऑपरेशन’ करून, अशी चोरी करणाऱ्यांना पकडण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर म्हणावी तेवढी कडक कारवाई करण्यात आली नाही. आता तर ही संख्या अधिकच वाढली आहे.

अधिकाऱ्यांकडून मोघम उत्तरे
अशा पाणी व्यावसायिकांबाबत अधिकाऱ्यांनाही नीटपणे काही सांगता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. आम्ही या व्यावसायिकांचा शोध घेऊ शकत नाही. त्यांच्याबाबत ठोस माहिती मिळाल्यावर कारवाई करता येईल, अशी मोघम उत्तरे अधिकारी देत आहेत. पाणी टंचाईच्या काळात अधिकारी पाणी चोरीच्या या प्रकाराबाबत गंभीर नसल्याचे किंबहुना सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

फिल्टर पाण्याला मोठी मागणी
गुगलवर अथवा जस्ट डायलवर अशा शेकडो व्यावसायिकांची यादी पत्ता आणि संपर्क क्रमांकासह येते, ही यादी महापालिकेला मात्र मिळत नाही. पाषाण, डेक्कन, औंध, कात्रज, कोंढवा, हडपसर, वडगावशेरी, विश्रांतवाडी, शिवणे, कोथरुड आदी भागांमध्ये अशा प्रकारचे प्लांट कार्यरत आहेत. सध्या लग्नसराई असल्याने फिल्टर पाण्याला मोठी मागणी आहे. याशिवाय कंपन्यांमध्येही अशा पाण्याचा मोठ्याप्रमाणावर सप्लाय केला जातो. या व्यावसायिकांनीही अक्षरश: पाण्याच्या खासगी टॅंकर सारखे एरिया वाटून घेतले आहेत. मात्र, या “पाणी माफियां’वर कोणतीच कारवाई होत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.