पुणे – गोड सीताफळांचा हंगाम सुरू झाला आहे. सोमवारी (दि. ३१) मार्केटयार्डातील फळ विभागात ६० किलो आवक झाली. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार ६० ते १२१ रुपये भाव मिळाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सीताफळांचे व्यापारी युवराज काची यांनी दिली.
वडकी येथील शेतकरी शशिकांत पाटे यांच्या शेतातून काची यांच्या मे. तुळजाराम पंथाराम बनवारी या फर्मवर ही आवक झाली. हा माल डेक्कन येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केला.
जानेवारी अखेरपर्यंत सीताफळांचा हंगाम सुरू राहणार आहे. हळूहळू आवक आणि सीताफळांच्या भावात वाढ होणार आहे.
नागरिक आवर्जून सीताफळांची वाट पाहत असतात. वडकी, पुरंदर तालुका, यवत, उरळी कांचन, राजगुरूनगर, खेड भागातून जिल्ह्यातून आणि सातारा जिल्ह्यातून आवक होत असते. मागील वर्षी करोनाचा फटका सीताफळांना बसला होता. परिणामी विक्री न झाल्याने निच्चाअंकी भाव मिळाला होता.