पुणे – शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, शुक्रवारी (दि. 29) आणखी 242 बाधित व्यक्ती सापडले आहेत. त्याचबरोबर शहरातील बाधितांची एकूण संख्या 6 हजार पार झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून, धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या पाच दिवसांत 1 हजार बाधित सापडल्याचे आकडेवारीतून समोर येते. दरम्यान, आज दिवसभरात 186 व्यक्ती बरे होऊन घरी गेले असून, घरी गेलेल्यांची संख्याही 3 हजार 450 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत करोनामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी शहरात 1 हजार 179 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तर, यापूर्वी गोळा केलेल्या सॅम्पलचे जे अहवाल मिळाले आहेत, त्यातून 242 नवीन रुग्ण सापडले आहेत. सध्या 2 हजार 340 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 166 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 45 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. 5 हजार 440 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मृतांमध्ये तिघांचा मृत्यू गुरूवारी झाल्याची नोंद झाली आहे. तर अन्य 7 जणांचा पहाटे 4 ते दुपारी 3.30 वाजेदरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यापैकी ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू पावलेली एक महिला शिरूरची असून वायसीएममध्ये मरण पावलेला 58 वर्षीय पुरूष जुन्नरचा आहे. मृतांमध्ये कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीमध्ये राहाणारे 72 वर्षीय व्यक्ती, पांडवनगर येथील 56 वर्षीय पुरूष, रविवार पेठेतील 61 वर्षीय महिला, कल्याणीनगर येथील 72 वर्षीय महिला, गंजपेठेतील 56 वर्षीय पुरूष, गोखलेनगर येथील 87 वर्षीय पुरूष, नागपूर चाळ येथील 68 वर्षीय महिला आणि पर्वती येथील 62 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. या सर्वांना जुने अन्य आजार होते.