पुणे – विवाहीत प्रेयसीच्या पतीने ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर प्रियकर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगेश सुरेश जाधव (वय 31) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहली असून, त्यामध्ये प्रेयसी व तिच्या पतीकडून मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी मंगेशचे वडील सुरेश मारुती जाधव (53, रा. कल्याण,जि.ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणीकाळभोर पोलिसांनी विवाहीत प्रेयसी व तिच्या पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.2) दुपारी एक वाजताच्या सुमारास मंतरवाडी परिसरात उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मगेश हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो देखील विवाहीत होता. मात्र पत्नीसोबत पटत नसल्याकारणातून तो एकटाच राहत होता. घराशेजारी राहणाऱ्या एका विवाहीत महिलेसोबत त्याचे सुत जुळले. मात्र तिच्या पतीला याबाबत माहिती मिळाली. त्याने आपल्या पत्नीला मुळ गावी वाशिम येथे पाठवून दिले. तरी देखील त्याची पत्नी मंगेश याला फोन करून त्याच्या परभणी जिल्ह्यातील बाजरबोरी या गावी निघून आली होती.
पत्नी घरातून निघून गेल्यामुळे पतीने रिसोड पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तिला मंगेश याच्या गावातून शोधून काढले. त्यावेळी तिने आपल्या पतीसोबत न राहण्याच्या निर्णय घेऊन मगेश सोबत राहणार असल्याचे पोलिसांना लिहून दिले. दरम्यान दोन ते अडीच महिन्यानंतर मंगेश व त्याची प्रेयसी हे दोघे मंतरवाडी परिसरात राहण्यास आले होते. त्यानंतर त्याची प्रेयसी आपल्या पतीसोबत फोनवर बोलत होती.
हा प्रकार मंगेश याला समजला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. तसेच तिचा पती देखील मंगेश याला जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. एकेदिवशी त्याची प्रेयसी न सांगताच घरातून निघून गेली. झालेल्या प्रकाराबाबत मंगेश याने त्याच्या आईला माहिती दिली होती. त्यानंतर त्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हंबीर करीत आहेत.