Pune Crime | कर्जाऊ दिलेल्या पैशाचे व्याज न दिल्याने तरुणाचा सपासप वार करुन खून

पुणे – कर्जाऊ दिलेल्या पैशाचे व्याज न दिल्याने झालेल्या वादातून दोघांनी एका तरुणावर चॉपरने सपासप वार करुन त्याचा खून केला. हा प्रकार कात्रज सिंहगड रोड दरम्यानच्या नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडवर रात्री साडेअकरा वाजता घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद शिवाजी आवारे (43 , रा. संभाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र प्रशांत महादेव कदम (37 , रा. धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदारावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आवारे यांनी प्रकाश शिंदे याच्याकडून व्याजाने एक लाख रुपये घेतले होते. त्याचे व्याज शरद दर महिन्याला तो देत होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात त्याने व्याज दिले नाही. त्यामुळे प्रकाश शिंदे याने शरद आवारे याला कात्रज रोडवरील चंद्रसखा वेअरहाऊसजवळ बोलावले होते. तेथे त्यांच्यात पुन्हा पैशावरुन वाद झाला. तेव्हा चिडलेल्या प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदाराने धारदार हत्याराने शरद याच्यावर सपासप वार केले.

शरद आवारे पत्नीसह आळंदीला गेला होता, तो रात्री दुचाकीवरुन घरी आल्या आल्या आरोपीचा त्याला फोन आला. तो पत्नीला घरी सोडून तसाच आरोपी प्रकाशला भेटायला गेला होता. शरद प्रकाशला भेटायला गेल्याची कल्पना त्याच्या मित्राला होती. मित्राने शरदला थोड्या वेळाने फोन केल्यावर तो बंद लागत होता. यामुळे त्याने प्रकाशला फोन करुन शरद बद्दल विचारले होते. आरोपींच्या मागावर भारती विद्यापीठ आणि गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.