पुणे – फेसबुकवर ओळख झालेल्या परदेशातील एका इसमाने वाढदिवसा निमित्ताने गिफ्ट पाठविल्याचा बहाणा करत, संबंधित गिफ्ट दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाचे अधिकाऱ्यांनी पकडले व ते साेडविण्याकरिता वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास लावून चार लाख ४३ हजार रुपयांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी फसवणुक झालेल्या ६२ वर्षीय महिलेने चतृश्रृंगी पाेलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विराेधात तक्रार दिली आहे.
सदर ज्येष्ठ नागरिक महिलेस एप्रिल २०२१ मध्ये फेसबकुवर डाॅ.डाेमीनीक गाेबेल या नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आली हाेती. ती तिने स्विकारल्यानंतर त्याने तिच्याकडील व्हाॅटसअप नंबरवर संर्पक करुन तिचा चॅटिंगच्या माध्यमातून विश्वास संपादन केला. तिला विश्वासात घेऊन त्याचा वाढदिवस असल्याचे सांगुन महिलेस परदेशातून महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. परंतु, गिफ्ट पाठविल्यानंतर आठवडयाभरात तिला गाेबेल नावाचे व्यक्तीने व दिल्ली येथून कस्टम अधिकारी संगीता तिवारी नावाचे महिलेने फाेन करुन तुमचे पार्सल कस्टम विभागाने पकडल्याचे सांगितले.
ते पार्सल साेडविण्याकरिता वेगवेगळे चार्जेस म्हणून महिलेस एकूण चार लाख ४३ हजार रुपये बँक खात्यावर आरटीजीएस करण्यास भाग पाडून तिची आर्थिक फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी चतृश्रृंगी पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांचे मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार लांबतुरे पुढील तपास करत आहे.