पुणे – पादचारी तसेच दुचाकीस्वारांना अडवून त्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत वाहनचालकांना अडवून चोरट्यांनी त्यांना लुटल्याची घटना घडली. लोहगावमधील फॉरेस्ट पार्क आणि नगर रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयासमोर या घटना घडल्या.
कमलेश पांडे घरपोच खाद्यापदार्थ पोहोचविणाऱ्या कंपनीत कर्मचारी आहे. पांडे दोन दिवसांपूर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास एका सोसायटीतील रहिवाशाकडे खाद्यापदार्थ पोहोचविण्यासाठी गेला होता. रात्री पावणेबाराच्या सुमारास पांडे लोहगावमधील फॉरेस्ट पार्क परिसरातून निघाला होता.
त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीनजणांनी दुचाकीस्वार पांडेला अडवले. त्याला चाकूचा धाक दाखविला. पांडेच्या मानेवर चाकूने वार करून चोरटे त्याची दुचाकी घेऊन पसार झाले. पांडेने याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी तपास करत आहेत.
दरम्यान, नगर रस्त्यावरील खाद्यापदार्थाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला नगर रस्त्यावरील वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयासमोर अडवून चोरट्यांनी त्याच्याकडील रोकड लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. आशिष किशोर रणदिवे (वय २७), अक्षय गौतम कांबळे (वय २६, दोघे रा. मुळीक कॉम्प्लेक्स, रामवाडी, नगर रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. टेम्पोचालक विकी जाधव (वय ३०, रा. नागपूर चाळ, येरवडा) याने यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
टेम्पोचालक जाधव नगर रस्त्यावरून मध्यरात्री दीडच्या सुमारास निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरून रणदिवे आणि कांबळे तेथे आले. त्यांनी टेम्पो अडवला. जाधवला धक्काबुक्की करून पैशांची मागणी केली. जाधवने नकार दिल्यानंतर दोघांनी टेम्पोच्या काचेवर दगड फेकून मारला. जाधवकडील ५४० रुपये घेऊन दोघेजण पसार झाले. जाधवने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी पकडले. उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करत आहेत.