Pune Crime: 17 तोळे सोने चोरणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात; 24 तासात गुन्हा उघडकीस

पुणे  – फुरसुंगीमधील मल्हार इमारतीत घरफोडी करून तब्बल 17 तोळे सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या दोन अल्पवयीनांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. अवघ्या चोविस तासात गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून 10लाख 25 हजार रुपये किंमतीचे 17 तोळे सोने हस्तगत करण्यात आले.

याबाबत फुरसुंगीतील मल्हार इमारतीमध्ये राहणाऱ्या रोहीत रामकिसन फेंडे यांनी फिर्याद दिली होती. 9 ऑक्टोेंबर रोजी फेंडे हे घराला कुलुप लावून कोल्हापूर येथील नातेवाईकांकडे गेले होते. सोमवारी (दि.11) रात्री ते परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानूसार त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. घटनेचा तपास करीत असताना पोलिसांनी इमारत परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रीकरण तपासले. यावरून संशयीत आरोपींची देहबोली निष्पन्न करून त्यांचा शोध घेण्यात आला.

या दरम्यान, फुरसुंगीतील अपेक्षा लॉन्स येथे मोपेड वाहनावरून दोन अल्पवयीन येणार असल्याची माहिती अंमलदार शशिकांत नाळे, अविनाश गोसावी यांना मिळाली होती. यानूसार दोन पथकांच्या माध्यमातून सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दागिने मिळून आले. त्यांनी दोघांनी मिळून घरफोडी केल्याचे कबूल केले.

मौजमजेसाठी त्यांनी घरफोडी केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. ही कारवाई हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे राजु अडागळे, दिगंबर शिंदे, सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.