पुणे – उद्योगपतीच्या व्यापारी संकुलामध्ये फुकट कार्यालय किंवा 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली. बांधकाम व्यावसायिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे गुन्हे आरोपींनी यापुर्वी केले असून त्यांच्या नावावर विविध पोलिस ठाण्यात यापुर्वीच गुन्हे दाखल आहेत.
राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज ऊर्फ सचदेव (रा.अंकुर सोसायटी, कमला नेहरू पार्क समोर, शिवाजीनगर), बापू गोरख शिंदे (रा.प्रज्वल रेसिडेन्सी, मानाजी नगर, नऱ्हे) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. याप्रकरणी उद्योगपतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी यांचा वानवडी येथे “93 ऍव्हेन्यु’ नावाचा व्यावसायिक प्रकल्प आहे. बजाज व शिंदे या दोघांनी फिर्यादीची महापालिकेमध्ये 16 सप्टेंबर रोजी भेट घेतली. तेथे त्यांनी फिर्यादीस त्यांच्या वानवडीतील प्रकल्पामधील एक कार्यालय मोफत द्यावे किंवा 50 लाख रुपयांची खंडणी द्यावी, अशी मागणी केली. फिर्यादींनी प्रतिसाद न दिल्यास त्यांचा प्रकल्प हा बेकायदेशीरपणे बांधलेला आहे, याप्रकरणी पोलिसात व इतर ठिकाणी तक्रार करून त्यांची बदनामी करु, तुमची वाट लावून टाकू, तुम्हाला कधी संपवुन टाकेन, अशा शब्दात धमकी दिली होती.
बजाजकडे वकीलीची सनद नसतानाही त्याने त्याचे वकीलपत्र न्यायालयात सादर केले. बनावट ओळखपत्राच्या आधारे वकील म्हणून काम करीत त्याने फिर्यादीकडून 11 लाख रुपयांची रक्कम घेतली. तसेच फिर्यादीच्या पिंपळे सौदागर येथील प्रकल्पातील एक सदनिका पुर्व पैसे न देता बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली.
याप्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी पसार झाले होते. दोघांनाही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. बजाजविरुद्ध डेक्कन, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फसवणूक, खंडणी, कौटुंबिक अत्याचार असे पाच गुन्हे दाखल आहेत. मुंबई व पुणे न्यायालयातही फसवणूक करून वकीली केल्याचे दोन दावे दाखल आहेत. तर शिंदे विरुद्ध बंडगार्डन, शिवाजीनगर,चतुःशृंगी पोलिस ठाण्यात जुगार चालविणे, दारु पिऊन वाहन चालविणे, खंडणी असे पाच गुन्हे दाखल आहेत.
न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलिस कर्मचारी सतिश भालेकर, महेश बामगुडे, अशोक माने, राहूल मखरे आदींच्या पथकाने हि कारवाई केली.