पुणे – बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्या दोघांना सिंहगडरोड पोलिसांनी अटक केली. दोघांकडून दोन गावठी बनावटी पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दिपक उर्फ भैय्याजी धनाजी जगताप (26, रा. मु पो. रांझे, ता. भोर, जि. पुणे) आणि हर्षद दिलीप चव्हाण (22, रा. मु. पो. ढाकाळी, पणदरे, ता. बारामती जि. पुणे मुळ रा. संभाजी चौक, खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेप्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अमंलदार उज्वल मोकाशी यांना जगताप आणि चव्हाण या दोन संशयीत आरोपींबाबत माहिती मिळाली. ते पिस्तुलासह फनटाईम थेटरच्या कॅनोल रोडच्या आडबाजुस थांबल्याचे समजले. त्यानुसार कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहून दोघेही दबकले. नजर चुकवुन पळून जाण्याच्या तयारीत असताना दोघांनाही पथकोन पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याजवळून दोन पिस्तुल जप्त करण्यात आली.
जगताप हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे, गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे, उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, अमंलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, सचिन माळवे, किशोर शिंदे, सागर भोसले, विकास पांडोळे यांनी ही कारवाई केली.