पुणे – चोरी केलेल्या चारचाकी वाहनाला डूप्लिकेट नंबरप्लेट लावून तामिळनाडूनला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली. पुणे सातारा रस्त्यावर समर्थ पोलीस आणि राजगड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. आरोपीला गाडीसह ताब्यात घेताना त्याने डोंगरावर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. आरोपी मूळचा तामिळनाडू येथील असून त्याने समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चारचाकी सेन्ट्रो कार आणि बोलेरो पिकअप चोरल्याची कबूली दिली.
मनीवैंदन सुबय्या नायडू ( रा. कन्याकुमारी, तामिळनाडू) असे अटक केलेल्याचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सेन्ट्रो कार आणि पिकअप चोरी गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी समर्थ पोलिसांत दोन गुन्हे दाखल आहे. गाडी चोरी गेलेल्या परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी करून आरोपींचा शोध घेत असता तामिळनाडू येथील एक सराईत येथील लॉजमध्ये राहील्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी संबंधीत लॉजवरून त्याचे आधारकार्ड व मोबाईल नंबर मिळविला.
त्याच्या नंबरचे लोकेशन हे खेड शिवापूर येथील असल्याचे कळाल्यांतर समर्थ पोलीस त्यादिशेने रवाना झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी पळून जाऊ नये, यासाठी राजगड पोलिसांना देखील ही माहिती देऊन त्याची गाडी ताब्यात घेण्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच सापळा रचून राजगड पोलिसांनी सातारा रस्त्यावर संशयीत सेन्ट्रो चालक नायडूला ताब्यात घेतले. यावेळी नायडू याने शेजारील डोंगरावर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, समर्थ आणि राजगड पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. तपासामध्ये त्याने दोन्ही वाहने चोरल्याची कबूली दिली. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतिश भालेराव, पोलीस अंमलदार संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, विठ्ठल चोरमले, शुभम देसाई, महेश जाधव, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, शाम सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.