पुणे – पुण्यातील धनकडवडी भागात मुलाने आपल्या वृद्ध आईचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश फरताडे (वय 42) असे हत्या करून आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तपासात गणेश यांनी केलेल्या आत्महत्येचे ह्रदयद्रावक कारण समोर आले आहे.
गणेश हा इंजिनिअर होता. त्याची नोकरी गेली होती. 5 वर्षांपूर्वी त्याचे वडिल अनेक महिने आजारी होऊन त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या आजारपणात खूप पैसा खर्च झाला होता. त्याच्या आईलाही अनेक व्याधी होत्या. त्यावर खूप पैसे खर्च होत होते. आईच्या औषधावर होणारा खर्च व नोकरी नसल्याने त्याला खूप कर्जही झाले होते. या कारणामुळे तो निराश झाला होता. त्यातून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
आपल्यामागे आईचे कोण पाहणार, हे लक्षात घेऊन त्याने आईला औषधांचा ओव्हर डोस दिला. ती निपचित पडल्यावर तिच्या चेहर्यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून गळ्यास पांढर्या रंगाच्या दोरीने घट्ट बांधून तिचा खून केला. त्यानंतर त्याने शनिवारी पहाटे 2 वाजून 10 मिनिटांनी एक मेसेज केला. आपण बेरोजगारी आणि कर्ज बाजारी झाल्याने आत्महत्या करीत आहोत, असा मेसेज त्याने आपल्या नातेवाईकांना पाठविला. त्यानंतर तो घराच्या छतावर गेला. तेथील लोखंडी हुकाला नायलॉनची दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या नातेवाईकांनी गणेशचा मेसेज सकाळी 7 वाजता पाहिला. त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस अधिक तपास करत आहेत.