पुणे – कोरेगाव पार्कमधील एक तारांकित हॉटेल भाडेतत्वावर चालविण्यास दिले असताना हॉटेल बंद करून मालकाकडे आठ कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील एका तारांकित हॉटेलच्या संचालकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत न्युओ कॉर्पिकोन प्लाझा प्रा. लि. कंपनीचे संचालक दीपक रहेजा (वय ६७, रा. जुहू, मुंबई) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी इंटर कॉन्टिनेंटल हॉटेल्स ग्रुप (इंडिया) प्रा. लि. च्या दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुदीप जैन (रा.वसंत विहार,दिल्ली), व्यवस्थापक नॉर्टन परेरा (रा. हरियाणा), संचालक व्यंकटेश गोमातम, अँजेलीन याप तसेच क्राऊन प्लाझा हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक फिनो बाबू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक रहेजा यांच्या कंपनीचे बंडगार्डन रस्त्यावर क्राऊन प्लाझा पंचतारांकित हॉटेल आहे. क्राऊन प्लाझा हॉटेल २०१६ मध्ये इंटर कॉन्टिनेंटल हॉटेल्स ग्रुप (इंडिया) प्रा. लि. या समुहाला चालविण्यास देण्यात आले होते. त्यानंतर रहेजा यांच्या क्राऊन प्लाझा हॉटेलमधील व्यवस्थापकीय संचालक फिनो बाबू यांच्याबरोबर संगमनत करून सुदीप जैन, नॉर्टन परेरा, व्यंकटेश गोमात, अँजेलीन याप यांनी रहेजा यांच्याकडे पाच कोटी ८६ लाख ९७ हजारांची रक्कम थकीत असल्याचे कळविले होते.
या वादातून रहेजा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानंतर पुन्हा रहेजा यांच्याकडे १४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. क्राऊन प्लाझा हॉटेलमधील अग्निरोधक यंत्रणा, बॅगेज स्कॅनर यंत्रणा नादुरू स्त होऊन बंद पडली. २१ जुलै रोजी क्राऊन प्लाझा हॉटेलला टाळे लावून बंद करण्यात आले.
रहेजा तसेच ग्राहकांना हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. रहेजा यांच्याकडे ८५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. रहेजा यांना देय असलेली आठ कोटी १३ लाख दोन हजार रुपयांची रक्कम मागण्यात आली. रक्कम दिल्यानंतर पुन्हा हॉटेल सुरू करा शकता, असे त्यांना सांगण्यात आले.
उच्च न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेण्यास सांगण्यात आले. रहेजा यांनी याबाबत तक्रार अर्ज दिल्यानंतर शहानिशा करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे तपास करत आहेत.