पुणे – महाराष्ट्र शासनाच्या योजनेतंर्गत जमीन विकत घेउन देण्याच्या आमिषाने महिलेला तब्बल २७ लाख ५१ हजारांचा गंडा घालणाऱ्या महिला आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक केली. अनिता भिसे असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दुर्गेश्वरी चित्तर (वय ४७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश्वरी यांचा काॅम्प्युटर क्लासेसचा व्यवसाय आहे. एकाच इमारतीत राहत असल्यामुळे त्यांची अनिता भिसे यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यानुसार अनिताने त्यांना उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे भासवून महाराष्ट्र शासनाच्या योजनेतंर्गत कमी किंमतीत जमीन घेउन देण्याचे आमिष दाखविले.
त्यानुसार तिने दुर्गेश्वरी यांच्याकडून २७ लाख ५० हजार रूपये घेतले. त्यानंतर आरोपी अनिताने संबंधित रक्कम पुणे कोषागार कार्यालयात जमा केल्याची बनावट पावती, पत्र देउन दुर्गेश्वरी यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले तपास करीत आहेत.