Pune Crime | एसयूव्हीमधून रेमडेसिव्हीर विकायला आले; गुन्हे शाखेच्या जाळ्यात सापडले

पुणे,दि. 2- होंडा कंपनीच्या आलिशान एसयूव्हीमधून रेमडेसिव्हर इंजेक्‍शन विकायला आलेल्या दोघा मावस भावांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या जवळून तीन इंजेक्‍शन हस्तगत करण्यात आली असून ती 1 लाख 5 हजारांना विकायच्या तयारीत आरोपी होते.

निखील बाबुराव जाधव(24,रा.आंबेगाव पठार व मयूर विजय चव्हाण(22,रा.वराळे, तळेगाव दाभाडे) अशी अटक आरोपींची नाव आहेत. दोघेही आरोपी उच्चभ्रू घरातील असून एकाचे शिक्षण बी फार्मसी घेत आहे. लॉक डाऊन असतानाही ते तळेगाव येथून इंजेक्‍शन विकण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सहायक पोलीस निरीक्षक संदिप बुवा पथकासह गस्त घालत असताना पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे व विवेक जाधव यांना दोन तरुण रेमडेसिव्हर इंजेक्‍शन प्रत्येकी 37 हजार रुपयांचा विकत असल्याची खबर मिळाली. त्यानूसार बनावट ग्राहकाव्दारे संपर्क साधून सापळा रचण्यात आला. निखील व मयुर दोघेही तळेगाववरुन तीन इंजेक्‍शन घेऊन एसयूव्ही कारमधून आले. त्यांना चौकशी करुन ताब्यात घेतले असता त्यांनी हे इंजेक्‍शन मैत्रिणीने विक्री करण्यासाठी दिले असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी तक्रार दाखल केली आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलीस अंमलदार मधुकर तुपसौंदर, राजेंद्र लांडगे, नितीन कांबळे, विवेक जाधव व अमर पवार यांच्या पथकाने केली.

– मैत्रणीसाठी काय पण…
यातील एक आरोपी बीफार्मसीचे शिक्षण घेत आहे. त्याच्या वर्गमैत्रीणीच्या वडिलांना करोना झाला होता. यासाठी तीने रेमडेसिव्हर इंजेक्‍शन घेऊन ठेवली होती. ते बरे झाल्यावर राहिलेली तीन इंजेक्‍शन तीने विकण्यासाठी आरोपीकडे दिली होती. आरोपी इंजेक्‍शनसाठी ग्राहक शोधत असल्याची खबर खंडणी विरोधी पथकाला मिळाली. यानंतर त्यांनी बनावट ग्राहकाव्दारे आरोपींशी संपर्क साधला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.