पुणे,दि.13 – कोरेगाव पार्क येथील एका मसाज सेंटरवर गुन्हे शाखेने छापा टाकून दहा मुलींची सुटका केली. यामध्ये नागालॅंड, मणिपुर, राजस्थान, मुंबई आणी सोलापूर येथील मुलींचा समावेश आहे. नागालॅंड व मणिपूर येथील मुलींना बॅकॉंक व पट्टाय्यामधील मुली असल्याचे भासवत ग्राहकांकडून दाम दुप्पट पैसे घेतले जात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कोरेगाव पार्क येथील नॅचरल बॉडी स्पा मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली होती. यानूसार सामाजिक सुरक्षा विभागामार्फत बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेण्यात आली. त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे लक्षात येताच छापा टाकून मुलींची सुटका करण्यात आली. पिडीत मुलींना महिला संरक्षण कक्षात ठेवण्यात आले आहे.
यासंदर्भात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यवस्थापक अर्जुन गोपाल सिंग(21,रा.शिवाजीनगर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पाचा मालक विलास ढाले फरार झाला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अंमलदार सुधीर इंगळे, संतोष भांडवलकर, अण्णा माने, राहुल सकट, बाबा कर्पे, काशिनाथ पुजारी, इरफान पठाण, प्रफुल्ल गायकवाड, निलम शिंदे, मनिषा पुकाळे व संगितता जाधव यांच्या पथकाने केली.