पुणे – राजगड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या सजगतेमुळे एक आंतरराज्यीय टोळी ग्रामीण पोलिसांच्या हाती लागली आहे. ही टोळी एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांना चाकूचा धाक दाखवून तसेच कार्डची अदला बदल करुन फसवणूक करत होती. या टोळीच्या ताब्यातून तब्बल १४७ एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत. ही टोळी उत्तर प्रदेशातील असून त्यांच्यावर तब्बल २० वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
समून रमजाद (३६, रा.हरियाणा), नसरुद्दीन नन्ने खान(३०, उत्तरप्रदेश), बादशाह इस्लाम खान( २४,रा. उत्तरप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार आदील सगीर खान(३०,रा.उत्तरप्रदेश) हा पळून गेला आहे.
यासंदर्भात माहिती देताना पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना दिल्ली पासिंगची एक कार संशंयीतरित्या खेडशिवापूर मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जाताना दिसली. ही कार रस्त्यात थांबल्यावर एक व्यक्ती एटीएम सेंटरमध्ये थांबला होता.
यामुळे अधिक संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग सुरु ठेवला. तोवर त्यांनी राजगड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना खेड शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी करायला लावून संशयीत कार थांबवण्यास सांगितले. त्यांनी कार थांबवताच त्यातील आदील खान हा पळून गेला. इतरांना ताब्यात घेतले असता, त्यांच्या गाडीत तब्बल १४७ एटीएम कार्ड सापडले. यानंतर त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
दरम्यान सायंकाळी माधवराव जल्लवाड (५६,रा. कोळवडे, भोर) हे राजगड पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी सांगितले की, एटीएम सेंटरमध्ये असताना एका अनोळखी व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. तसेच एटीएम सेंटरमध्ये आमची माणसे आहेत, तुमच्या एटीएम कार्डचा पीन सांगा नाहीतर तुम्हाला जीवे मारु अशी धमकी दिली.
यामुळे ते एटीएम कार्ड तेथेच सोडून निघुन आले. दरम्यान त्यांना आरोपी काही वेळातच कारमधून पळून जाताना दिसले. तसेच त्यांच्या बँक खात्यातून ५० हजाराची रक्कम कट झाल्याचा मेसेजही आला. त्यांना जप्त केलेली कार आणि आरोपी दाखवले असता, त्यांनी त्यांना ओळखले. त्यांची फिर्याद घेऊन चारही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली आदी राज्यांत अशा प्रकारे गुन्हे केले आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर अधिक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक अंबादास बुरटे यांच्या पथकाने केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करत आहेत.