Pune Crime | दारुला पैसे न दिल्याने तरुणाचा केलेला खून दोन वर्षाने उघडकीस

पुणे – दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन चार मित्रांमध्ये वादविवाद झाला होता. यामध्ये तीघांनी मिळून पैसे न देणाऱ्याचा खून केला .मात्र खून केल्यानंतर मृतदेह मिळूनही खूनाचे कारण आणी आरोपीसंदर्भात माहिती मिळत नव्हती. अखेर दोन वर्षानंतर खूनातील आरोपींना जेरबंद करण्यात येरवडा पोलिसांना यश मिळाले.

देवा राठी (25-,रा.लोहगाव,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. येरवडा पोलीसांना दोन वर्षापूर्वी त्याचा मृतदेह मिळाल्यानंतर ही ओळख न पटल्याने गुन्हयाचा तपास पुढे जात नव्हता. याप्रकरणी कुणाल जाधव(23-), राकेश ऊर्फ बापु भिसे (24,रा.लक्ष्मीनगर,येरवडा,पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तर आरोपी निखील तुळशीराम यादव हा सध्या येरवडा कारागृहात दुसऱ्या एका गुन्हयात जेरबंद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार येरवडा पोलीस ठाण्याचे हद्दीत डॉन बॉस्को शाळेच्या मागे झुडुपात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह 25/5/19 रोजी मिळून आला होता. मात्र, संबंधित खून झालेल्या तरुणाची ओळख पटत नव्हती. त्याचे बेपत्ता झाल्याची तक्रार कुठे नसल्याने आरोपींचाही माग लागत नव्हता. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे व पोलीस नाईक अमजद शेख यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सदरचा खून हा कुणाल जाधव व राकेश भिसे यांनी केला आहे.

त्यानुसार पोलीसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे यांनी दिली आहे. मयत देवा राठी हा हाऊस किंपींगचे काम करत होता परंतु तो मुळचा कुठे राहणारा आहे, त्याचे कुटुंबीय कोण आहे ? याचा तपास केला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी सांगितले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.