पुणे – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोक्का कायद्याचा सक्षमपणे वापर सुरु केला आहे. त्यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्विकारताच मोक्का, तडीपारी आणी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला आहे. शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचाली वर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली अवघ्या 11 महिण्यात मोक्का अंतर्गत 50 वी कारवाई करण्यात आली आहे. ही 50 वी कारवाई आरोपी बल्लूसिंग टाक गॅगविरूध्द करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 5 जूलै रोजी रात्री चे सुमारास आरोपी बल्लूसिंग प्रभूसिंग टाक (रा. वानवडी), उजालासिंग पभूसिंग टाक व पळून गेलेले त्यांचे साथीदार सोमनाथ नामदेव घारोळे, पिल्लूसिंग कालूसिंग जुन्नी, जलसिंग रजपुतसिंग दुधानी व गोरखसिंग गागासिंग टाक यांनी तवेरा गाडीमधून दरोडा टाकण्याच्या हत्यारासह येवून पंचरत्न सोसायटीमधील बंद फ्लॅटचे लॉक तोडून दरोडा टाकून पळून जात होते. यावेळी घटनास्थळी दाखल झालेले पोलीस अधिकारी अंमलदार यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पोलीसांवर धारदार हत्याराने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला केला होता. त्यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान नमूद टोळीचा प्रमुख बल्लूसिंग टाक हा त्याचे इतर साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी चालवून सन 2008 पासून गंभीर स्वरूपाचे शरिराविरूध्द व मालमत्तेविरूध्दचे गुन्हे करत असल्याचे उघड झाले. टोळीचा प्रमुख बल्लुसिंग टाक याने गुन्हे करताना वेगवेगळे साथीदार घेऊन आपल्या टोळीची दहशत व वर्चस्व राखण्याकरीता तसेच स्वतःचे व टोळीचे अवैध अर्थिक फायदयाकरीता दरोडयाची
तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगुन दहशत माजविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे चढत्या क्रमाने केले आहेत.
टोळी प्रमुख व त्याचे टोळीचे सदस्य यांना गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्याचे उद्देशाने त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई तसेच हद्दपारी सारखी ठोस कारवाई करून देखील त्यांचे गुन्हेगारी वर्तनात काहीएक चांगला परिणाम झाला नव्हता. त्यामुळे त्यांचेवर ठोस व कडक कारवाई करणे आवश्यक होते. यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरुड पोलीस ठाणे यांनी अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांचे मार्फतीने प्रस्ताव सादर केला होता.