पुणे – बस प्रवासात जाणीवपूर्वक तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या पीएमपी बस वाहकाला सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना सहकारनगर येथील दाते बसस्टॉप ते के. के. मार्केटयार्ड बसस्टॉप दरम्यान सोमवारी सायंकाळी घडली आहे.
विश्वनाथ केदा ठाकरे (41, रा. संतोषनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या बस वाहकाचे नाव आहे. याप्रकरणी एका 22 वर्षांच्या तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही सहकारनगरमधील दाते बसस्टॉप येथून बसमध्ये बसली.
बसमध्ये गर्दी असल्याचा गैरफायदा घेऊन वाहकाने तरुणीच्या अंगाशी लगट करुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. यानंतर तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी विश्वनाथ ठाकरे याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
प्राथमीक माहितीच्या आधारे कर्मचाऱ्याचे निलंबण करण्यात आले आहे. त्याची खात्याअंतर्गत चौकशी करुन पुढील कार्यवाही केली जाईल. – सतीश घाटे (जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएल)