पुणे – आर्मी पब्लीक स्कुलमध्ये क्रीडा साहित्याची खरेदी करायची बतावणी करून चोरट्यांनी कर्वेनगर भागातील एका क्रीडा साहित्य विक्रेत्यास ऑनलाइन गंडा घातला. शाळेसाठी वीस बॅट खरेदी करण्याची बतावणी करून बँक खात्यातून ५० हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत क्रीडा साहित्य विक्रेत्याने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांच्या वडिलांचे कर्वेनगरमधील पोतनीस सोसायटी परिसरात क्रीडा साहित्य विक्रीचे दुकान आहे. आठवड्यापूर्वी तक्रारदारांचे वडिल दुकानात होते. त्या वेळी चोरट्याने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. खडकी भागातील आर्मी पब्लिक स्कुलमधून बोलत असल्याची बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली होती. शाळेसाठी वीस बॅट खरेदी करायच्या आहेत, असे चोरट्याने त्यांना सांगितले. खरेदी व्यवहाराचे पैसे अॅपद्वारे पाठवितो, असे चोरट्याने त्यांना सांगितले.
त्यानतंर चोरट्याने तक्रारदाराच्या वडिलांना पुढील व्यवहार करण्यासाठी अॅपद्वारे पाच रुपये पाठविण्यास सांगितले. चोरट्याने ऑनलाइन पद्धतीने वडिलांच्या खात्यातून ५० हजार रुपये लांबविले. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संगीता पाटील तपास करत आहेत.