पुणे – खडक पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला पिस्तूलासह जेरबंद केले . विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. साहील मजिद खान (२७, रा. घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल , एक जिवंत काडतूस असे ५१ हजाराचे शस्त्र सापडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिल्या आहेत. त्यानूसार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयीत व्यक्तींची तपासणी सुरु आहे.
यावेळी पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना खबर मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार साहील खान याचेकडे पिस्तुल असुन तो लोहीयानगर येथील भावसार मंगल कार्यालय जवळ उभा आहे. ही खबर सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांना कळविण्यात आली. त्यांनी वरिष्ठांच्या सूचनेनूसार सापळा रचला. त्यांना साहिल खान तेथून जाताना दिसला.
मात्र पोलिसांना बघुन तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी थोड्याच अंतरावर त्याला शिताफीने पकडले. त्याची झाडाझडती घेतली असता पॅन्टमध्ये कंबरेस उजव्या बाजुस खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझीनसह व डाव्या खिशात ०१ जिवंत काडतूस मिळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, उपायुक्त संदिपसिंह गिल, सहायक आयुक्त नूतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार , राहूल गौड, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, शेखर खराडे, लखन ढाविरे, सद्दाम तांबोळी, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, मयूर काळे, संतोष बारगजे, उमेश मठपती, विश्वजीत गोरे, शोएब शेख, इरफान नदाफ यांचे पथकाने केली आहे.