“…नाहीतर जीवंत सोडणार नाही” – बलात्काराचा बनाव करत एअरफोर्सच्या माजी अधिकाऱ्याकडून खंडणीची मागणी

पुणे – एअरफोर्सच्या माजी अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्य अडकवत 50 लाखाची खंडणी मागण्यात आली. त्याला मारहाण करुन जबरदस्तीने तीन लाखाचे धनादेश घेऱ्यात आले. याप्रकरणी चौघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. दत्तात्रय यादव (47,रा.आळे, ता. जुन्नर), उत्तम तानाजी कुऱ्हाडे (40, रा.आळे, ता. जुन्नर), अनिल ज्योतिराम वाल्मिकी (45,रा.कात्रज), नारायण सोन्याबापु जाधव (38, रा.जुन्नर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी होणाजी गुंजाळ (59,रा.चंदननगर) यांना आरती नावाच्या एका महिलेने फोन करुन नोकरीबाबत विचारणा केली होती. यानंतर आय लव्ह यू सारखे मेसेज पाठवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर त्यांना 16 ऑगस्ट रोजी नारायणगाव येथे बोलावून घेतले. तेथून दोन किलोमीटर आत एका घरात नेण्यात आले.
तेथे आरतीने तीच्या चार साथीदारांना बोलावून घेतले. तेथे आल्यावर चौघांनी तु आरतीसोबत शरीरसंबंध ठेवले असा जाब विचारत कुऱ्हाड घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यातून मार्ग काढायचा असेल तर 50 लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
यानंतर तडजोडीनंतर विमाननगर येथे येऊन प्रत्येकी 10 लाख रुपयांचे तीन धनादेश घेण्यात आले. बॅंकेतून पैसे काढून घेईपर्यंत हॉटेलमध्ये रहाण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. फिर्यादी तक्रार दाखल केल्यावर विमानतळ पोलिसांना दोन आरोपी धनादेशासह हॉटेलमध्ये सापडले.
आरोपी अनिल वाल्मिकीचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. नारायण जाधव हा शेळ्यांचा व्यापारी आहे. तर यातील एकाचा पुर्वी डांन्स बार होता. त्यांनी अशाप्रकारे अनेक गुन्हे केल्याची शक्यता आहे. -भरत जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक )





