पुणे, दि. ७ – शहरात पोलिसांनी तिसावी मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई केली आहे. चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलावर धारदार हत्यारांनी वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणार्या व ताडीवाला रोड परिसरात दहशत माजविणार्या तडीपार गुंड सुलतान उर्फ टिप्या लतीफ शेख याच्यासह त्याच्या टोळीतील नऊ साथीदारांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही ३० वी कारवाई करण्यात आली. तर या वर्षातील अवघ्या चार महिन्यात करण्यात आलेली ही २५ वी कारवाई आहे. टोळी प्रमुख टिप्या, विनोद उफई विन्या सुनिल वाघमारे, साहील उर्फ सोन्या राजु वाघमारे, श्याम किशोर काळे, शुभम अनिल धिवार, रामनाथ उर्फ पापा मेनीनाथ सोनवणे, सागर उर्फ सॉगी किशोर गायकवाड, अनिकेत किशोर खंदारे, सौरभ तिमाप्पा धनगर आणि अतुल श्रीपास म्हस्कर उर्फ सोनु परमार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ९ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून टोळी प्रमुख टिप्या अद्यापही फरार आहे.