Pune Crime News – कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर तिक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली. नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय १९, रा. बालाजी सोसायटी, शिरसवाडी, वाडेबोल्हाई, नगर रस्ता) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय ३०, रा. बकोरी, ता. हवेली, नगर रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत शाहरुख दस्तगीर पठाण (वय २३, रा. बालाजी सोसायटी, शिरसवाडी, वाडेबोल्हाई, नगर रस्ता) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी शैलेंद्र आणि त्याची पत्नी नम्रता यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. शैलेंद्रने तिच्याकडे सोन्याचे दागिने मागितले होते. या कारणावरुन झालेल्या वादातून गुरुवारी (दि. २२) शैलेंद्रने रात्री साडेनऊच्या सुमारास नम्रतावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. नम्रताला रुग्णालयात दाखल केले असता उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी पाहणी केली. पसार झालेला आरोपी शैलेंद्र याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक खेडकर तपास करत आहेत. “विवाहास दोन वर्षे झाले होते, कौटुंबिक कारणावरुन वाद होत असल्याने दोघे वेगळे रहात होते. नम्रताचे दागिने शैलेंद्रकडे होते. ती वारंवार त्याच्याकडे दागिण्यांची मागणी करत होती. त्या कारणावरुन दोघे वाडेबोल्हाई येथील एका शाळेच्या मागे भेटायला आले होते. तेथे शैलेंद्रने नम्रतावर धारदार शस्त्राने तीच्या चेहऱ्यावर वार केले.” – सर्जेराव कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे