Pune | पुण्यात नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; ‘त्या’ स्टॉल्सना टाळे

पुणे – लॉकडाऊनच्या काळात महापालिकेने खाद्यपदार्थ विक्रीसाठी पथारी तसेच स्टॉल्सना फक्‍त पार्सल देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ग्राहकांना स्टॉलसमोर खाण्यासाठी मुभा देणाऱ्या 8 स्टॉलधारकांवर पालिकेने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यासोबतच त्यांचे स्टॉल काही दिवसांसाठी सील केल्याची माहिती अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

शहरात सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पथारी व्यावसायिकांना मुभा दिली आहे. मात्र, त्या ठिकाणी केवळ पार्सल देता येणार आहे, तसेच पार्सल घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे.

मात्र, शुक्रवारी अतिक्रमण विभागाने केलेल्या तपासणीत लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती, शिवाजीनगर येथील प्राइड हॉटेल लगतच्या स्टॉलवर गर्दी आढळल्याने चार स्टॉल सिल केले. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. तसेच पुढील काही दिवस हे स्टॉल सील ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतरही संबंधित ठिकाणी नियम न पाळले गेल्यास साथ संपेपर्यंत ते स्टॉल सील केले जाणार आहेत.

सध्याच्या संकट काळात कोणत्याही व्यावसायिकावर कारवाई करण्याचा हेतू नाही. मात्र, अशा प्रकारे शहराच्या सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होत असल्यास कारवाई क्रमप्राप्त आहे. अत्यावश्‍यक सेवांमध्ये सूट देण्यात आलेल्या व्यावसायिकांनी नियमांची अंमलाबजावणी करणे गरजेचे आहे.
– माधव जगताप, अतिक्रमण नियंत्रण विभाग प्रमुख, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.