Pune Crime News : शेयर मार्केट मधील नुकसानीचे कर्ज फेडण्यासाठी Civil Engineerकडून महागड्या मोबाईलची ‘चोरी’

पुणे –  नाशिक येथील सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा शिक्षण पूर्ण केलेल्या एका तरुणाने मित्रांकडून पैसे उधार घेत शेयर मार्केट मध्ये गुंतवले होते. परंतु शेयर मार्केट मध्ये दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याने ते फेडण्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्कड येथील मोबाईल एक्सप्रेस दुकानात महागडे मोबाईल चोरी करून पसार झालेल्या भामट्यास डेक्कन पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतले आहे.

तोयस संजय पाटील ( वय-१९,रा. सिडको, नाशिक) असे सदर आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी एक लाख तीन हजार रुपये किंमतीचे दोन महागडे मोबाईल जप्त केले आहे. याबाबत पोलिसांकडे गणेश पुंडलिक पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

पाच फेब्रुवारी रोजी गणेश पाटील यांचे सागर आर्कड येथील मोबाईल एक्सप्रेस दुकानात मास्क बांधून एक अनोळखी तरुण आला.  त्याने महागडे मोबाईल खरेदी करण्याचे बहाण्याने दुकानदारास मोबाईल दाखवण्यास सांगितले. दुकानदार मोबाईल दाखवत असतानाच, दुकानदार पाठीमागे वळला असल्याचे पाहत आरोपीने काउंटर वरील दोन मोबाईल घेऊन पळ काढला.

आरोपी चोरी करतानाची घटना दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. याबाबत डेक्कन पोलिसांकडे तक्रार आली असता, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण आधारे तपास करत आरोपीस नाशिक येथून जेरबंद केले. सदर कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांचे पथकाने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.