Pune Crime News : शहरातील सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रांपैकी एक असलेल्या मार्केट यार्डमध्ये उघडकीस आलेल्या बहुचर्चित ‘फंड स्कॅम’ने व्यापारी वर्तुळात अक्षरशः खळबळ उडवली आहे. डेली कलेक्शनच्या नावाखाली तब्बल दीडशे ते दोनशे कोटी रुपयांच्या फसवणुकीचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणाने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एका मोठ्या आर्थिक जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी समीर विनायक आखाडे (रा. मित्रमंडळ कॉलनी, पर्वती) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाजार समितीचा माजी सदस्य अनिल दिनकर देवडे (६३), रोहन अनिल देवढे (३७) आणि चंद्रशेखर नारायण देवढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘दररोज ५००, आणि परतावा २ टक्के!’ – लालसेचा सापळा भाजीपाला विभागातील व्यापाऱ्यांना आरोपींनी एक आकर्षक पण धोकादायक स्कीम दाखवली. “दररोज ५०० रुपये फंडमध्ये टाका आणि त्यावर २ टक्के परतावा मिळवा,” असे आश्वासन देत अनेकांना जाळ्यात ओढण्यात आले. सहा वर्षांच्या या योजनेत मोठा नफा मिळेल या आशेने व्यापाऱ्यांनी लाखो-कोट्यवधी रुपये गुंतवले. scam फिर्यादी समीर आखाडे यांच्यासह 6 जणांची तब्बल 3 कोटी ३१ लाख ४४ हजार रुपये २०१४ ते २०२२ दरम्यान गुंतवले. मात्र स्कीम पूर्ण झाल्यानंतरही एक रुपयाचाही परतावा न मिळाल्याने संशय बळावला. पैसे मागितल्यावर टाळाटाळ, कारणांची सरबत्ती आणि अखेर फसवणूक उघडकीस आली. शंभर ते दीडशे व्यापाऱ्यांची अडकलेली कोटींची रक्कम या स्कॅममध्ये सुमारे १०० ते १५० व्यापाऱ्यांनी गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. अनेकांकडे व्यवहारांची पावती किंवा कागदपत्रे नसल्याने ते पुढे येण्यास घाबरत होते. त्यामुळे प्रत्यक्ष फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन स्कीम, एकच जाळे! बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी केवळ डेली कलेक्शनच नव्हे तर डाळींच्या व्यवसायाच्या नावाखालीही मोठी गुंतवणूक उभी केली. या दुसऱ्या स्कीममध्ये मोठ्या व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याने एकूण घोटाळा १५० ते २०० कोटींच्या घरात जाऊ शकतो. पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचले प्रकरण फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत. शहर हादरवणारा आर्थिक स्फोट पुण्यातील व्यापारी जगतात विश्वासावर उभ्या असलेल्या व्यवहारांना या स्कॅमने मोठा धक्का दिला आहे. ‘जास्त परतावा’ या मोहाने अनेकांचे आयुष्यभराचे कष्ट एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहेत. हेही वाचा: Sonam Kapoor Baby Boy: सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली; वायुला मिळाला लहान भाऊ!