पुणे – आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात मोबाईल गेम खेळताना झालेल्या वादातून एका तरुणाने मित्रावर गावठी कट्टातून गोळीबार केला. ही घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी भारती विद्यापींठ पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
निलेश संतोष जाधव (२१,रा.सिंहगड महाविद्यालय परिसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. या घटनेत करण गजलमल हा जखमी झाला आहे. करण हा सेल्समनचे काम करतो, तर निलेश कोणताही कामधंदा करत नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार निलेश, करण आणि एक अल्पवयीन मुलगा सिंहगड महाविद्यालय परिसरातील मैदानावर रात्री साडेनऊच्या सुमारास मोबाईलवर गेम खेळत बसले होते. तेव्हा त्यांच्यामध्ये चेष्टा -मस्करीतून वादावादी झाली. याचा राग आल्याने निलेशने जवळील गावठी कट्टातून करणवर गोळी झाडली.
ही गोळी करणच्या खांद्याला लागल्याने तो जखमी झाला. करणला अल्पवयीन मुलाने नागरिकांच्या मदतीने रुग्णलयात दाखल केले. तेथून भारती विद्यापीठ पोलिसांना खबर मिळाली. यानंतर निलेशला सिंहगड महाविद्यालय परिसरातून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करत आहेत.