Pune Crime News : गुंड गजा मारणे ‘फरार’; मालमत्ता जप्तीची कार्यवाही सुरु

- वारजे येथील गुन्हयात पोलिसांनी केली झाडाझडती सुरु -

पुणे – गुंड गजा मारणे विरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारजे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात मारणेला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत झाली आहेत. मारणे आणी त्याच्या साथीदारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली आहे.

यानंतर तो अटकेच्या भितीने फरार झाल्याचे जाहीर करण्यात आले. तर दुसरीकडे त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तांवर टाच आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मालमत्ता जप्तिचा जाहिरनामा काढण्याची कार्यवाही सुरु आहे. त्याच्या साथीदारांवरही अशाच प्रकारे कार्यवाही करण्यात येत आहे.

वारजे पोलीस ठाण्यात गजा मारणेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मारणे याने साथीदारांसह चांदणी चौकात गैरकायद्याची मंडळी जमवली . तसेच गस्तीवरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कोव्हिड 19 च्या अनुषंगाने परवानगि घेतली का अशी विचारणा केल्यावर आरोपी संतोष शेलार याने वाहनातून हात बाहेर काढून सहायक पोलीस निरीक्षकास ढकलून दिले. असे म्हटले आहे. यात जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही कलम लावण्यात आले आहे. या गुन्हयात गजा मारणेसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वतंत्र पथके रवाना 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मारणे व त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी वारजे माळवाडी, कोथरुड व गुन्हे शाखा यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. संशयीत ठिकाणी छापामारी करण्यात येत आहे. सर्व आरोपींच्या घरझडत्या घेण्यात येत असून तांत्रीक तपासही केला जात आहे. आरोपींना आसरा देणाऱ्यांचीही माहिती काढण्यात येत आहे. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.