– संजय कडू
पुणे – विधवा महिलेची जागा हडप करून तिला धमकावल्याबद्दल मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई (रा.कावळे वस्ती,माळवाडी,हडपसर) व त्याचे साथीदार यांच्यावर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पिट्याभाई सीआयडी अधिकारी किंवा पत्रकार असल्याचे सांगत अनेकांना धमकावत असल्याची बाबही पोलीस तपासात पुढे आली आहे. त्याने या प्रकारे कोणाची फसवणूक केली असल्यास वानवडी पोलिसांनी माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
महिलेच्या तक्रारीविरुन मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई, जावेद शेख उर्फ बिल्डर, शाम सुसगोहीरे, दिनकर सुसगोहीरे, शामराव गायकवाड(सर्व रा.वानवडी) यांच्या विरुद्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अंधेरी ईस्ट (मुंबई) येथे रहाणाऱ्या विधवा महिलेची सय्यदनगर सर्व्हे न 75 मध्ये मालकी हक्काची जागा होती.
मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई व त्याच्या साथीदारांनी जागेचा बनावट दस्तऐवज बनवला. यानंतर महिलेच्या जागेवर ताबा मारून पत्र्याच्या खोल्या बांधून त्या बांगलादेशी नागरिकांना भाड्यानं दिल्या. सदर महिलेस मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई याने सय्यदनगर व मुंबई येथे तिच्या राहत्या घरी वारंवार धमकावले तसेच जीवे ठार मारण्याचीही धमकीही दिली.अखेर या महिलेने मेहबूब शेख व त्याच्या साथीदार यांच्या विरोधात सलग पाच वर्ष पुणे पोलिसांकडे तक्रारी देत पाठपुरावा केला. तीने मेहबूब शेख याचे विविध गॅंगस्टर,लॅंड माफिया यांच्याशी संबंध असलेले पुरावे दिले. यानंतर संबंधीत महिलेच्या तक्रारीची दखल घेत वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
राजकारणी व नामांकित गुंडाबरोबर छायाचित्र
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई पोलीस निरीक्षकाचा गणवेश घालून नागरिकांना मी सीआयडी ऑफिसर आहे,ह्यूमन राईट्सचा पदाधिकारी व परिवर्तन संस्थेचा अध्यक्ष आहे तसेच पत्रकार असल्याची तोतयागिरी व बतावणी करत होता. याप्रकारे दहशत माजवत जागा लुबाडने,खंडण्या गोळा करणे असे उद्योग करत असतो. तसेच विविध मान्यवर आणि राजकारणी व नामांकित गुंड यांच्यासोबतचे फोटो दाखवून हे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असतो. पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार वानवडी पोलिसांनी दाखल केले आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जोगदंड करत आहेत.
वानवडी पोलीस ठाण्यातील वसुलीची कामे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याशी पिट्याभाईचे चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. यामुळे त्याच्यावर अनेकदा गुन्हे दाखल होता, होता वाचले.