तब्बल 64 तोळे सोने केले हस्तगत
पुणे – आलीशान कारमधून येऊन शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करणार्या सराईताला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 64 तोळे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली महागडी कार जप्त केली आहे. जयवंत गोवर्धन गायकवाड उर्फ जयड्या असे अटक् करण्यात आलेल्याचे नाव आहे. समर्थ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे करीत असताना तांत्रिक महितीच्या आधारे संशयित चोरटा सराईत घरफोडी करणारा चोरटा गायकवाड असावा असे त्यांना वाटले. त्यांनी जयवंत गायकवाड याचे रेकॉर्ड व फोटो प्राप्त केले. पोलिसांना प्राप्त झालेल्या फुटेज मधील संशयित हा जयवंत गायकवाड असल्याची त्यांची खात्री झाली. दि. 21 मार्च 2020 रोजी पोलिसांना गायकवाड हा बालेवाडी फाटा येथे येणार असल्याची माहिती पथकातील पोलिस हवालदार संतोष काळे यांना मिळाली.
त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलिस हवालदार राजस शेख, सुशिल लोणकर, संतोष काळे, पोलिस नाईक प्रमोद टिळेकर, पोलिस शिपाई अनिल शिंदे, स्वप्निल वाघोले, सचिन पवार, गणेश कोळी, निलेश साबळे, सुमित खुट्टे, साहिल शेख प्राप्त माहितीच्या आधारी त्या ठिकाणी पोहचले. दरम्यान, गायकवाड हा बालेवाडी येथील ज्युपीटर हॉस्पीटलच्या गेटजवळ येताच पोलिसांची खात्री झाल्याने त्याला पोलिसांनी घेराव करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील तपासात त्याने दि. 18 मार्चला पहाटे रास्ता पेठेतील बिल्डींगमध्ये चोरी केल्याचे सांगितले. त्यातील दागिने हे त्याच्याजवळच असल्याने तो म्हणाला. त्याची अंगझडती घेण्यात आली असता त्याच्या अंगझडतीमध्ये 20.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सापडले. त्याच्याकडे अधिक तपास करण्यात आला.
त्याने विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणार्या नवी पेठेतीत राजेंद्रनगर येथे एक महिन्यापूर्वी घरफोडी करून व इतर चोरीचा ऐवज हा बाणेर येथील मणिपूरम गोल्डच्या शाखेट तारण ठेऊन रोख रक्कम घेतली असल्याची माहिती दिली. त्यानुसार तेथून तारण ठेवलेले तब्बल 43.9 तोळे दागिने पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 15 लाख 86 हजार रूपयांचे 63.9 तोळे दागिने यावेळी जप्त करण्यात आले. त्याबरोबरच गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी गायकवाड याच्याकडे तपास करून दोन गुन्ह्याचा छडा लावला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मागर्दशनानुसार तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलिस हवालदार, राजस शेख, सुशिल लोणकर, संतोष काळे, पोलिस नाईक प्रमोद टिळेकर, कर्मचारी अनिल शिंदे, स्वप्निल वाघोले, सचिन पवार, साहिल शेख, निलेश साबळे, गणेश कोळी, सुमित खुट्टे यांनी ही कारवाई केली.