Crime | जावयाकडून गळा दाबून सासूचा खून; कर्नाटकातून आले होते पळून

पुणे,दि.2- सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून जावयाने सासूचा गळा आवळून खून केला. ही घटना बिबवेवाडी येथे घडली. जावई सासूला घेऊन कर्नाटकातून पळून पुण्यात आला होता. येथे दोघे भाड्याने खोली घेऊन एकत्र रहात होते. बिबवेवाडी पोलिसांनी पळून गेलेल्या जावयाला अटक केली आहे.

अनारकली महमद तेरणे(45,रा.सध्या शेळके वस्ती, बिबवेवाडी, मुळ बेळगाव, कर्नाटक) असे मृत महिलेचे नाव आहे. असिफ दत्तगिर अत्तार(26) याला खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अनारकली हिच्या मुलीशी असिफचा विवाह झाला होता. हे सर्व जण कर्नाटकामध्ये रहात होते. दरम्यान असिफ व अनारकली यांच्यामध्ये प्रेमसंबध सुरु झाले. यातून ते दोघेही पळून पुण्यात आले. येथे असिफ मजुरीचे काम करत होता. एकत्र रहात असताना दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. या भांडणास कंटाळून असिफने रागाच्या भरात हाताने व ओढणीने अनारकलीचा गळा दाबून खून केला.

यानंतर तो घराला कुलूप लावून पळून गेला. त्याने जाताना त्याच्या मित्राला अनारकलीचा खून केल्याचे सांगितले. मित्राने ही बाब बिबवेवाडी पोलिसांना सांगितल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. असिफला कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडण्यात आले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.