पुणे – चारित्र्याच्या संशयावरुन एकाने पत्नीचा चाकुने गळा चिरून खून केल्याची घटना हडपसर भागात शनिवारी घडली. अंजली नितीन निकम (वय २२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती नितीन निकम (सध्या रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ रा. दहिगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली.
नितीन भोसरीतील एका कारखान्यात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. सहा वर्षांपूर्वी त्याचा अंजलीबरोबर विवाह झाला होता. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून तो अंजलीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरुन त्यांच्यात वादही झाला होता. त्यामुळे अंजली हडपसर भागातील गोसावी वस्तीत आईकडे राहण्यासाठी आली होती.
शनिवारी दुपारी नितीन अंजलीला मूळगावी नेण्यासाठी हडपसर भागातील सासूरवाडीत आला होता. बंटर स्कुलजवळून तो तिला दुचाकीवरून घेऊन निघाला होता. त्याने बहाणा करून दुचाकी थांबवली. चाकुने तिच्या गळ्यावर केले. अंजली रस्त्यात कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या नितीनला पकडले. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.