पुणे,दि.29-करोनामुळे नागरिकांना खरेदीसाठी ठराविक वेळ ठरवून देण्यात आली आहे. यामुळे भाजी मंडई व किराणा दुकानांमध्ये मोठी गर्दी होत आहे. याचा फायदा घेत पैसे खाली पडले असल्याचे सांगत नागरिकांचे मोबाईल चोरण्यात येत होते. याप्रकारे चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश तिम्मा मकराळे(27,रा.घोरपडी) व धर्मा बसप्पा गवंडी(27,रा.घोपरडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पैसे खाली पडल्याचा बहाणा करत एका व्यक्तीचा मोबाईल चोरण्यात आला. याप्रकरणी दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी पंकज क्षत्रिय (48,रा.सहकारनगर) हे लक्ष्मीनगर पोलीस चौकीसमोर फळे खरेदी करत होते. यावेळी त्यांच्या जवळ एक व्यक्ती आला त्याने तुमचे पैसे खाली पडले असल्याचे सांगितले. फिर्यादी खाली बघत असतानाच त्याने फोन हिसकावून घेतला.
फिर्यादीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी त्याच्या सहकाऱ्यासह दुचाकीवरुन पळून गेला. याप्रकरणाचा तपास करत असताना दोन चोरटे सहकारनगर येथी पाटे संस्कृती इमारतीजवळ मोबाईल विक्रीसाठी थांबले असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचून दिनेश व धर्मा यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी हे भाजी व मंडई व गर्दीच्या ठिकाणी पैसे खाली टाकून हात चलाखीने मोबाईल हिसकावून नेत होते. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांच्यावर कोथरुड, चतुश्रृंगी, हडपसर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपास अधिकारी स्वप्निल लोहार यांनी व्यक्त केली.
याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, सोमनाथ पोटे, अंमलदार विशाल ठोंबरे, सतिश भारती, महेश गाढवे, अमित सुर्वे, सागर सुतकर, शरद राऊत, नवनाथ भोसले, विष्णु सुतार, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, शिवाजी क्षिरसागर यांच्या पथकाने केला.