पुणे – शिवाजीनगर, लोणीकाळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तीन घरफोडीच्या घटनांमध्ये 1 लाख 70 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीनही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी शिवाजीनगर येथील लक्ष्मी व्हिला येथील रेव्हेन्यु कॉलनी मध्ये शिरून फिर्यादी महादेव साहेबराव जाधव (57) यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या मर्सडिज बेंज गाडीवर स्कॅ्रच मारून वायफर तोडून अपार्टमेंटमधील नागरिकांच्या घरातून मोबाईल, रोख रक्कम, घड्याळ, हार्ड डिक्स असा 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
दुसर्या घटनेत थेऊर येथील बोडके वस्ती येथे राहणार्या अनुराधा संजय बधे व त्यांचे कुटुंबिय टेरेसवर झोपण्यासाठी गेले असताना चार अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून 91 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी पहाटेच्या सुमारस घडला.
तर तिसर्या घटनेत नेहरू चौकातील न्यु बीग बाजार जवळ मुक्ताई अपार्टमेंटमध्ये असलेल्या स्वाती गणेश बनसोडे (33) यांच्या घराचा दरवाजाचे लॉक तोडून घरातील 44 हजारांचे दागिने चोरून नेले. हा प्रकार फिर्यादी कामाला गेल्या असताना बुधवारी दुपारच्या सुमारास घडला.