पुणे – फुरसुंगी परिसरात वर्दळीच्या वेळीच गुंडांच्या टोळक्याने लॉन्ड्री चालकाचा कोयत्याने वार करत खून केल्याचा प्रकार सोमवारी ( दि. ७) सायंकाळी घडला. पूर्ववैमनस्यांतून हा प्रकार घडला असून मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
गणेश महापुरे (वय २५, रा. हडपसर ) हे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापुरे याचे फुरसुंगीमधील गंगानगर भागात लॉन्ड्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते दुकानात काम करत होते. साधारणत: सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोयतेधारी टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी दुकानात घुसून गणेश याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर टोळके पसार झाले.
वर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नातेवाईकांनी दुकानात धाव घेतली. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला. हडपसर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला.