पुणे – लॉकडाऊनमध्ये दगड खाण व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडल्याने पैशांची चणचण जाणवू लागली. यातून बाहेर पडण्यासाठी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथभल चौघांनी गुन्हेगारीचा मार्ग निवडत अँटी करप्शनचे अधिकारी असल्याचे भासवत साराफा व्यावसायिकाच्या कामगाराचे अपहन करून रक्कम लुटली होती. हा प्रकार पुण्यात 7 मार्च रोजी घडला होता. याप्रकरणी तपास करून स्वारगेट पोलिसांनी चौघा खाण मालकांसह नांदेड येथील सराईतास जेरबंद केले.
शरीफ मोहंमद सरवर शेख (54, रा. नांदेड), विपीन व्दारकादास तिवारी (35, रा. इंदौर, मध्य प्रदेश), कपील विरसिंग यादव (29, रा. झॉंशी, उत्तर प्रदेश), भूपेंद्र शामलाल राय (30, रा. बिना, मध्य प्रदेश), शैलेंद्रकुमार रामसेवक राय (31, रा. उरई, उत्तर प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके सलग आठ दिवस इंदौर, मध्य प्रदेश, झॉंशी, उत्तर प्रदेश, नांदेड येथे फिरत होती.
त्यांच्याकडून कारसह 33 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. हि कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक अशोक येवले, अंमलदार ज्ञाना बडे, मनोज भोकरे आदींच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हेगाराने ठेवली महिनाभर पाळत
मधुरम सत्यानारायण सोनी (27, रा. गंगासिटी, नांदेड) यांचा शुद्ध सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ते पुण्यातील व्यापाराकडून रोख व्यवहार करून सोने खरेदी करतात. नेहमीप्रमाणे त्यांचा कामगार शंकर भालेराव हा सोने खरेदीसाठी नांदेड येथून पुण्यात येणार होता. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी व परिसराची रेकी करण्यासाठी आरोपींनी स्थानिक गुन्हेगार शरीफ मोहंमद सरवर शेख याला नेमले होते. त्यानुसार शेख याने माहिती मिळवून ती आरोपींना दिली होती.
अशी घडली घटना
आरोपींनी शेख याने दिलेल्या माहितीच्या आधारावर भालेराव प्रवास करत असलेल्या खासगी बसचा नांदेड ते पुणे असा कारने पाठलाग केला. स्वारगेट येथील वेगा सेंटर येथे भालेराव उतरल्यानंतर त्यांना अँटी करप्शनचे अधिकारी असल्याची बतावणी आणि पिस्तूलाचा धाक दाखवत कारमध्ये जबरदस्तीने बसवत त्याच्या ताब्यातील रोकड लुटली. त्यानंतर त्यांना राजगुरूनगर येथील अज्ञातस्थळी सोडून आरोपी पसार झाले होते.