पुणे – लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन ४५ लाख रुपये उकळणाऱ्या काश्मिरी तरुणाला मध्य प्रदेशात अटक करण्यात आली. त्याने दिल्ली, फरिदाबाद, भोपाळ, इंदूरमधील तरुणींची विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही कामगिरी काळेपडळ पोलीस ठाण्याने केली.
अमन प्रेमलाल वर्मा ( ३८, रा. बिश्ना, जम्मू काश्मिर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणीने फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्मा मूळचा जम्मू काश्मिरमधील आहे. त्याने एका विवाह विषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती.
संकेतस्थळाच्या माध्यमातून तो तरुणींशी संपर्क साधायचा. त्यांना विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढायचा. हडपसर परिसरातील पिडीत तरुणीला त्याने जाळ्यात ओढले होते. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तसेच तिच्याकडून वेळोवेळी बतावणी करुन ४५ लाख रुपये घेतले.
तरुणीची फसवणूक करुन तो पुण्यातून पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने वर्माला मध्य प्रदेशातील इंदूर परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विवाहाच्या आमिषाने दिल्ली, फरिदाबाद, इंदूर, भोपाळमधील तरुणींची फसवणूक केल्याचे सांगितले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक विलास सुतार, हवालदार युवराज दुधाळ, श्रीकृष्ण खोकले यांनी ही कामगिरी केली.
पिडीत तरुणी संगणक कंपनीत कामाला आहे. तीची २०२० मध्ये अमनबरोबर विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख झाली होती. त्यांनतर तीने मागील तीन-चार वर्षे एकूण ४५ लाख रुपये दिले आहेत. त्याचा २०२१ मध्ये विवाह झाला असून एक मुलगाही आहे. तो जम्मूमध्ये एका खासगी कंपनीत काम करतो. त्याच्यावर इतर राज्यात दोन खटले सुरु आहेत तर एका गुन्हयात त्याने तडफोड केली आहे. त्याचे व्यक्तीमत्व रुबाबदार असल्याने अनेक मुली त्याच्यावर विश्वास ठेऊन फसल्या गेल्या आहेत.