पुणे -ऑनलाईन आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या बुकीला भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलिसांनी अटक केली. राहुल सुभाष पांडे (वय ४८, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) असे अटक केलेल्या बुकीचे नाव आहे. त्याच्याकडून लॅपटॅप, टॅब, ६ मोबाईल, रोख १० हजार ६५० रुपये असा ५१ हजार ८१० रुपयांचा ऐवज जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सुशांत फरांदे यांनी फिर्याद दिली आहे. पांडे याचा ऑनलाईन लॉटरी व्यवसाय असून त्यातूनच तो क्रिकेटचा बुकी बनल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, मागील रविवारी आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्यांवर दोन आंतरराष्ट्रीय बुकींना पोलिसांनी अटक केली होती.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आता सट्टेबाजांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्यां दोघा आंतरराष्ट्रीय बुकींना गुन्हे शाखेने रविवारी अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल ९३ लाख रुपयांचा रोकडसह साहित्य जप्त केले होते. दरम्यान, धनकवडीत एकजण ऑनलाईन लॉटरी सेंटर चालविताना सट्टा घेत असल्याची माहिती भारती विद्याीपीठ आणि सहकारनगर पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पथकाने हिल व्ह्यु सोसायटीत पांडे याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तो कोलकत्ता नाईट रायरडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामन्यावेळी ऑनलाईन बुकिंग घेत असल्याचे दिसून आले. त्याच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जुगाराची आकडेवारी असलेनक स्क्रिन शॉट व जुगाराची आकडेवारी असलेल्या वहीचे फोटो दिसून आले आहेत. ही कामगिरी अपर आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सुधीर घाडगे, अंबरनाथ बापू खुटवड, महादेव नाळे, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदीप बेडीस्कर, सागर सुतकर, शिवलाल शिंदे यांनी केली.
-दुसऱ्यांच्या नावे सीमकार्डची खरेदी
मोबाईलचा वापर बेटिंगसाठी झाल्याचे आढळून आले आहे. त्यातील सीम कार्ड हे लातूर येथील नागनाथ जाधव, बिबवेवाडीतील योगेश तलरेजा आणि सदाशिव पेठेतील तुषार खालकर यांच्या नावावर आहे. त्यांच्या नावाने कागदपत्रे सादर करुन बेटिंगसाठी सीमकार्ड खरेदी केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुधीर एस घाडगे तपास करीत आहेत.