Pune Crime | नांदायला येत नाही म्हणून पत्नीचा भर चौकात खून

पुणे – नांदायला येत नाही म्हणून भर चौकात पत्नीचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना भेकराईनगर येथे बुधवारी सकाळी घडली. आरोपी पतीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी हडपसर पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शुभांगी सागर लोखंडे(21,रा.हडपसर) असे मृत महिलेचे नाव आहे. तीचा खून केल्याप्रकरणी पती सागर बाळू लोखंडे याला अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनूसार सागर व शुभांगी दोघांचाही दुसरा विवाह आहे. एक वर्षापुर्वीच त्यांचा विवाह झाला होता. शुभांगी सासरी नांदत असताना सागर दारु पिऊन नेहमी तीला त्रास देत होता. ती नेहमी आजारी असल्याने सागरच्या त्रासाला कंटाळून अनेकदा माहेरी रहायला येत होती. 

सध्याही सागरचे दारुचे व्यसन वाढल्याने ती माहेरी आली होती. बुधवारी सकाळी ती आई व मावशी सोबत कामाला चालली होती. यावेळी तीघींना सागरने भेकराईनगर येथील शिवशक्‍तीनगर चौकात गाठले. तेथे त्याने शुभांगीला नांदायला चलायची मागणी केली. मात्र तीने नकार दिल्यावर सागरने अचानक जवळ लपवलेला चाकू काढून तीच्या पोटात खुपसला. 

शुभांगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी सागरला पकडून चोप दिला. यानंतर पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात दिले. गंभीर जखमी झालेल्या शुभांगीचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.