पुणे – हॉटेल मालक व वेटरने ग्राहकास बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. मालकाचा मोबाईल चोरल्याने ही मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करुन हडपसर पोलिसांनी हॉटेल मालक व वेटरला अटक केली आहे.
रवि दिप्लु राठोड (वय.40,रा. गोडबोले वस्ती मांजरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.अनिल मोरे व बाबूराव जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी हॉटेल मालक व वेटरला अटक केली असून, दोघांच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुरेश दिपलू राठोड (वय.28,रा. गोडबोले वस्ती मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना गुरूवारी (दि.11) मार्च रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास गोपाळपट्टी हडपसर येथील शिवशाही व्हेज नॉनव्हेज हॉटेल परिसर ते मांजरी रेल्वे पटरीच्या बाजूला घडली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अनिल मोरे याचे शिवशाही नावाचे हॉटेल आहे. गुुरुवारी सकाळी मोरे व त्यांचा वेटर बाबुराव जाधव मोबाईलवर गाणी ऐकत नाष्टा करत होते. त्यावेळी फिर्यादी सुरेश व त्यांचा मित्र रवी दोघे नाष्टा करण्यासाठी हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी नाष्ट्याची ऑर्डर दिली. त्यानुसार त्यांना नाष्टा दिला.
मात्र दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडले त्यावेळी हॉटेल मालक मोरे यांना त्यांचा मोबाईल ठेवलेल्या जाग्यावर दिसला नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्हीची पाहणी केली असात तो नाष्टा करून जाणाऱ्या दोघांपैकी एकाने पळवल्याचा संशय आला. त्यानुसार मोरे व त्याच्या वेटरने पाठलाग करून काही अंतरावर दोघांना गाठले.
मोबाईल चोरी केल्याच्या रागातून रवी राठोड याला बेदम मारहाण केली. मुका मार लागल्याने सुरुवातीला रवी याला काही जाणवले नाही. मात्र काही वेळानंतर त्रास होऊ लागल्याने त्याला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी सांगितले