पुणे – कुत्रा आईच्या अंगावर भुंकल्याने चौघांनी एका तरुणीला बेदम मारहाण करून जखमी केले. संबंधीत तरुणी त्या कुत्र्याला खायला टाकत होती. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
राजाराम मारुती चौधरी, त्यांची आई मालुबाई चौधरी, पत्नी बायडा राजाराम चौधरी आणि मंदाकिनी चौधरी (सर्व रा. म्हातोबानगर, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत निशा पंडित थरकुडे (वय 40, रा. म्हातोबानगर, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे असून, शेजारी राहण्यास आहेत. फिर्यादी यांनी 30 डिसेंबर 2020 रोजी रात्री पावणे अकरा च्या सुमारास एका कुत्र्याला खायला टाकले होते. ते कुत्रे राजाराम चौधरी यांच्या आईच्या अंगावर भुंकले. त्या कारणातून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन डाव्या हाताची करंगळी पकडून जोरात वाकवून त्यांना जबर दुखापत केली. त्यामुळे फिर्यादींचे शारिरीक व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, फिर्यादी यांनी हा प्रकार घडला तेव्हा कोथरुड पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रारीची चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.