Pune Crime : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लुटमार करणारी चोरट्यांची टोळी ‘गजाआड’

पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकचालकांना अडवून लुटमार करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले. चोरट्यांनी लुटमारीचे पाच गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गणेश हरिभाऊ वाघमारे (वय २८), संतोष उर्फ मंगल्या वाघमारे (वय २१, दोघे रा. मोरबवेवाडी, खालापूर, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार संतोष मारूती हिलम, रोहिदास जाधव, राकेश वारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामशेत परिसरातील ताजे येथील एका पेट्रोल पंपावर ट्रकचालक दुर्गाप्रसाद कहर (वय २७, रा. उत्तरप्रदेश) याला धमकावून चोरट्यांनी ७० हजारांची रोकड लुटली होती. द्रुतगती मार्गावर ट्रकचालकांना अडवून लुटणारीच्या घटना वाढीस लागल्या असल्याने ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून (एलसीबी) चोरट्यांचा माग काढण्यात येत होता.

खालापूर परिसरातील चोरट्यांनी लुटमारीचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मोरबेवाडी परिसरात सापळा लावून वाघमारेंना ताब्यात घेतले. चौकशीत दोघा चोरट्यांनी साथीदारांच्या मदतीने लुटमारीचे पाच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, शब्बीर पठाण, सुनील जावळे, काशीनाथ राजापुरे, मुकुंद आयाचित, प्रकाश वाघमारे आदींनी ही कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.