Pune Crime : नामांकित डॉक्‍टरच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला मध्यप्रदेशातून अटक; 30 लाखाचा ऐवज जप्त

पुणे – लोणावळ्यातील नामांकित डॉ. हिरालाल खंडेलवाल (73 ) यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास खिडकीद्वारे प्रवेश करून चाकूच्या धाकाने डॉक्‍टर दाम्पत्याचे हातपाय बांधून धाडसी दरोडा टाकणाऱ्या 15 जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबईसह मध्यप्रदेशातून अटक केली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, मोबाईल फोन असा 30 लाख 52 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेले सर्व आरोपी मुंबईतील फिल्मसिटीत मजूर म्हणून कामाला होते.अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. यावेळी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन काळे, उपनिरीक्षक रामेशवर धोंडगे उपस्थित होते.

हेमंत रंगराज कुसवाह (24 ), नथू साधू देशमुख (52 , रा. औढोली, मावळ), सुनील शेजवळ (40 रा. घाटकोपर वेस्ट), रवींद्र पवार (42 , रा. अंधेरी वेस्ट), शामसुंदर शर्मा (43 , रा. गोरेगाव पुर्व), मुकेश राठोड (45 , रा. घाटकोपर वेस्ट), सागर धोत्रे (25 , रा. हडपसर), प्रशांत उर्पै हेमंत पटेल (27 , रा. मध्यप्रदेश), दीनेश अहिरे (38 , रा. घाटकोपर), विकास गुरव (34 , रा. वाकोला, मुंबई), संजय शेंडगे (47 , रा. घाटकोपर), दौलत पटेल (24 ), विजय पटेल (21 ), गोविंद कुशवाह (18 ), प्रदीप धानूक (28 , सर्व रा. मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लोणावळ्यातील प्रधान पार्क सोसायटीत डॉ. खंडेलवाल पत्नीसह राहायला असून त्याचठिकाणी त्यांचे रूग्णालय आहे. 17 जूनला पहाटेच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या घरात प्रवेश करून धाडसी दरोडा टाकला होता. खंडेलवाल दाम्पत्याचे हातपाय बांधून 66 लाख 78 हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुंबईतून 8 जणांना अटक केली होती. त्यानंतर मुख्य आरोपी हेमंत कुसवाह सह 5 जण आणि दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले.

हेमंत सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध चार राज्यात घरफोडी, दरोड्याचे गुन्हे असल्याचे उघड झाले आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कॉवत, लोणावळा पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, राजेंद्र थोरात, दत्तात्रय जगताप, विद्याधर निचीत यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.