पुणे- मध्यरात्री दारु पित बसलेल्या दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याचा खुन केला. राजन रमेश सहानी (27 , रा. वारजे नाका) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी किसन प्रकाश वरपा (21 , रा. श्रमिक वसाहत, कर्वे रोड) याला अटक केली आहे. ही घटना डेक्कन पोलीस ठाण्यासमोरील गरवारे शाळेच्या आवारात घडली आहे.
याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, राजन हा पेटिंगचे काम करतो. राजन आणि किसन दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन आहे. किसन काहीही कामधंदा करीत नाही रविवारी दुपारी दोघेही दारु पिण्यासाठी अड्ड्यावर आले होते.
तेथून ते सिंहगडावर गेले. तेथे त्यांनी दारु पिली. रात्री उशीर झाल्याने किसन हा राजनला घेऊन गरवारे शाळेत आला. किसन हा तेथे शिकला असल्याने रात्री उशीर झाल्यावर तो कंपाऊंडवरुन उडी मारुन येथील व्हरांड्यात झोपत असे. त्याप्रमाणे दोघेही कंपाऊंडवरुन उडी मारुन आत आले. दुसऱ्या मजल्यावरील व्हरांड्यात त्यांनी पुन्हा उरलेली दारु पिली.
त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. सध्या शाळेत रंगकाम सुरु आहे. तेथे एक फावडे पडले होते. ते राजनने किसनच्या हातावर मारले. त्यामुळे किसन याने भिंतीवरील फायर सेफ्टीचा लाल डब्या काढून राजनच्या डोक्यात घातला.
वर्मी घाव बसल्याने राजन जागेवरच निपचित पडला. त्यानंतर किसन याने त्याला ओढत एका क्लासरुममध्ये नेले. तेथे पुन्हा त्याला दोन तीन वेळा मारले. त्यानंतर तो सकाळ झाल्यावर घरी निघून आला.